एक दिवसीय भटकंतीकडून 'रेंज ट्रेक'च्या ओढीकडे
२०२३ हे वर्ष माझ्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक कलाटणी देणारं ठरलं. निमित्त होतं—पीएचडी प्रवेश आणि त्यासोबतच सह्याद्रीतील सूक्ष्मजीवांवर (Microorganisms) संशोधन करण्याची मिळालेली सुवर्णसंधी! माझ्यासाठी आता फक्त रविवारच नाही, तर आठवड्याचे सातही दिवस सह्याद्रीच्या सानिध्यात किंवा कामात असणार होते, याचा आनंद काही वेगळाच होता. वर्षभर नाशिक ते कोल्हापूर आणि रायगड ते नगर अशा विस्तीर्ण पट्ट्यात फिरून अनेक किल्ले आणि डोंगरांवरील मातीचे नमुने गोळा केले.
सर्व काही उत्तम सुरू होतं, पण हळूहळू एक दिवसीय भटकंतीची ओढ कमी होऊ लागली. आता मन ओढ घेऊ लागलं होतं ते सह्याद्रीच्या कुशीत किमान दोन-चार दिवस सलग वावरण्यासाठी! साहजिकच, 'रेंज ट्रेक्स' करण्याची इच्छा प्रबळ झाली. कोणतीही मोठी गोष्ट करण्यासाठी केलेली 'हळूहळू पण सातत्यपूर्ण' सुरुवात नेहमीच फळते; याच विचाराने मी छोटे-छोटे टप्पे पार करायला सुरुवात केली.
सह्याद्रीत अशा असंख्य वाटा आहेत, पण त्यातील सर्वात प्रसिद्ध भटकंती म्हणजे—कात्रज ते रायगड! साधारण ८० किलोमीटरचा हा कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा आणि रायगड असा प्रवास. या सर्व किल्ल्यांना मी याआधी स्वतंत्रपणे भेटी दिल्या होत्या, पण त्यांना जोडणाऱ्या सह्याद्रीच्या रांगड्या पाऊलवाटा अद्याप पायाखाली तुडवल्या नव्हत्या. कात्रज ते सिंहगड आणि सिंहगड ते राजगड हे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले होते. आणि आता वेळ होती—स्वराज्याची राजधानी 'राजगड' ते स्वराज्याचं तोरण 'तोरणा' हा ऐतिहासिक पल्ला गाठण्याची!
गुंजवणे ते राजगड आणि तोरणाच्या वाटेवरचा एक अविस्मरणीय मुक्काम
राजगडाच्या दिशेने प्रस्थान :
दिवस शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५. मुंबईहून ट्रेकर्स मंडळी पुण्यात दाखल झाली. मनात उत्साह आणि बॅगेत ट्रेकिंगचे सामान घेऊन, ऐन दुपारी १२ च्या ठोक्याला आम्ही दुचाकीवरून राजगडाच्या दिशेने प्रस्थान केले. पाषाण ते गुंजवणे हे साधारण ६० किमीचे अंतर पार करताना वेगापेक्षाही पुढच्या प्रवासाची ओढ जास्त होती. दीड वाजता आम्ही गुंजवणे गावात पोहोचलो आणि क्षणाचाही विलंब न लावता 'चोर दरवाजा'च्या दिशेने चढाई सुरू केली.
राजगडची राजस वाट:
पाली दरवाजाच्या तुलनेत हा मार्ग कमी उभ्या चढाईचा असला, तरी इथली नागमोडी वळणे मनाला साद घालत होती. मध्येच येणाऱ्या सपाटीमुळे थकवा जाणवत नव्हता. आम्ही चौघेही एका लयीत चालत होतो. वाटेत ठिकठिकाणी खुणा असल्याने मार्ग चुकण्याची भीती नव्हती. समोर उभा असलेला राजगड जणू खुणावत होता. गडाची पद्मावती माचीचा विस्तार, आकाशाला भिडणारा बालेकिल्ला, लांबवर पसरलेली सुवेळा माची आणि नैसर्गिक चमत्काराची साक्ष देणारे 'नेढं' पाहत असताना वेळ कसा गेला कळलंच नाही. कितीही वेळा राजगड पाहिला तरी दरवेळी इथलं सौंदर्य नवं वाटतं. शेवटच्या टप्प्यातील उभ्या चढाईला सळई आणि रोपचा आधार घेत आम्ही दुपारी ३ वाजता चोर दरवाजातून पद्मावती माचीवर पाऊल ठेवले.
पद्मावती मातेचा आशिर्वाद:
मंदिरात जाताच आईचे ते तेजस्वी रूप पाहून प्रवासाचा सगळा शीण उतरला. नतमस्तक होऊन तिथल्या टाक्यातील थंडगार पाणी बाटल्यांमध्ये भरले. अर्धा तास तिथे विसावल्यानंतर आमचा पुढचा टप्पा होता—संजीवनी माची. ऊन थोडे मऊ झाले होते. संजीवनी माचीच्या टोकाकडे न जाता डाव्या हाताला असलेल्या 'अळू दरवाजा'तून आम्ही खाली उतरलो. हा मार्ग माचीला पूर्ण वळसा घालून तोरण्याकडे जातो.
| अळू दरवाजा |
लक्ष्य - महादू बाबांचे घर:
आज तोरणा गाठायचा नव्हता, तर राजगड आणि तोरणा यांच्या मधोमध वसलेल्या महादू कचरे यांच्या घरी मुक्काम करायचा होता. राजगड ते तोरणा किल्ला हे जवळपास १२ किमी अंतर आणि तर दोन्ही किल्ल्यांना जोडणाऱ्या हा डोंगरी मार्ग जवळपास ९ किमीचा. साडेचार वाजले होते, संजीवनीच्या पायथ्यापासून अजून ४-५ किमी चालायचे होते. अंधार व्हायला दोन तास शिल्लक होते. सुरुवातीचा उतार तीव्र असल्याने पाय सावरून उतरावे लागले.
| संजीवनी माचीजवळील तीव्र उत्तर |
तासाभराने आम्ही पाली-खुळशी खिंडीतील रस्त्यावर आलो. रस्ता ओलांडून पुढच्या जंगलाच्या वाटेला लागलो. वाढत्या झाडीमुळे अंधार लवकर पडेल असे वाटत होते. वाटेत कुठे चुकू नये म्हणून सॅटेलाईट मॅप आणि मार्किंगवर आमचे बारीक लक्ष होते.
सोनेरी सूर्यास्त आणि एक निवांत मुक्काम :
अखेर सहाच्या सुमारास मुख्य वाटेपासून डाव्या बाजूला महादू बाबांचे घर दिसले. बाबा आणि आजींच्या प्रसन्न भेटीने मन प्रसन्न झाले. "पोहे खाल का?" या बाबांच्या प्रश्नावर आम्ही तत्काळ होकार दिला. सकाळच्या नाश्ता नंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. नाश्ता तयार होईपर्यंत घरामागच्या सपाटीवर आम्ही सूर्यास्त पाहिला—कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर सूर्यास्त तोच होता!
| महादू बाबांच्या घरापासून पाहिलेला सूर्यास्त |
पोहे खात असताना बाबांनी आमच्यासमोर काही नोंदवह्या ठेवल्या. त्या वह्या वाचताना मन भरून आले. वर्षानुवर्षे तिथे येणाऱ्या भटक्यांनी आपले अनुभव, बाबांचे प्रेम आणि सह्याद्रीतील त्या घराशी जुळलेले नाते त्यात शब्दांत मांडले होते. मी सुद्धा माझे मनोगत लिहिले. सह्याद्रीतील ही साधी माणसे आपल्याला कधी कुटुंबाचा भाग बनवून घेतात, हे कळतही नाही. तिथे वीज नव्हती, पण बाबांकडील सौर दिव्यांचा उजेड पुरेसा होता. रात्रीच्या जेवणात अस्सल गावरान 'पिठलं-भाकरी'चा बेत झाला. पोटभर जेवण करून आम्ही बाहेर बसलो. बाहेर कडक थंडी, ताऱ्यांनी भरलेले आकाश आणि कीटकांच्या किरकिरीशिवाय असणारी गूढ शांतता! रात्री १० वाजता बाबांनी घरातच केलेल्या अंथरुणावर आम्ही झोपी गेलो. उद्याची पहाट तोरण्याच्या दिशेने एक नवे आव्हान घेऊन येणार होती.
सूर्यदेवाचं दर्शन आणि तोरणा गाठताना झालेली 'रायगड' भेट….
राजगडामागचा तो सोनेरी क्षण:
सकाळी ६ वाजता जाग आली. रात्रीच्या शांत झोपेनंतर आता वेध लागले होते ते तोरणा गाठण्याचे. पण निघण्यापूर्वी एका खास क्षणाची प्रतीक्षा होती—राजगडाच्या पाठीमागून होणारा सूर्योदय! आम्ही बाबांच्या घराबाहेर राजगडाच्या दिशेने डोळे लावून बसलो होतो. आम्ही राजगडाच्या उंचीच्या तुलनेत बरेच खाली असल्याने, संजीवनी माचीच्या मागे लपलेले सूर्यदेव वर यायला थोडा वेळ लागणार होता. हळूहळू आभाळ भगवेमय होऊ लागले आणि अखेर ७ वाजता तो सोन्याचा क्षण आला! माचीच्या टोकावरून सूर्याच्या किरणांनी सर्व काही प्रकाशमय झाल. तो विलोभनीय देखावा कॅमेरात टिपला. बाबांसोबत नाश्ता केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
| सूर्योदय आणि राजगड |
रायगडचे दर्शन आणि बुधला माचीची आव्हानं:
बाबांच्या घरापासून पुढचा मार्ग ओसाड माळरानावरून जातो. इथून चालताना डोळे फक्त एकाच गोष्टीचा शोध घेत होते—'श्रीमान दुर्गदुर्गेश्वर रायगड'! तासाभराच्या चालीनंतर अचानक रायगडाचा माथा दिसू लागला. 'बुधला माची' ही तोरण्याची उंचीवरची माची, तिथून रायगड आणि लिंगाणा अधिक स्पष्ट दिसतील या कल्पनेने आमच्या पावलांचा वेग वाढला. १० वाजले होते आणि उन्हाची प्रखरता जाणवू लागली होती. बुधला माचीवर प्रवेश करणे हे एक आव्हानच आहे. उभ्या कातळात लोखंडी शिडी असली, तरी तिथे अत्यंत सावधगिरीने चढावे लागते. एकमेकांना साथ देत आम्ही अखेर बुधला माचीवर पाऊल ठेवले.
स्वराज्याच्या दोन राजधान्यांना नमन:
माचीवरील सुळका मागे टाकताच समोरचे दृश्य पाहून शब्द हरपले. समोर दिमाखात उभा असलेला रायगड आणि शेजारीच ताठ मानेने उभा असलेला लिंगाणा!
| बुधला माची, दूरवर मागे लिंगाणा आणि रायगड |
खरंतर रायगडला जाण्यासाठी तोरणा न गाठता इथूनच 'वाळंजाई दरवाजा'तून भट्टी गावात उतरावे लागते. काही काळ त्या पवित्र भूमीकडे पाहत आम्ही मनोमन ठरवले—'लवकरच रायगडची वारी करायची!' तिथून पुढे कोकण दरवाजा मार्गे आम्ही तोरण्यावर प्रवेश केला. सकाळी ८ ला निघालेलो आम्ही ११ वाजता तोरणा किल्ल्यावर पोहोचलो. एका बाजूला राजगड आणि दुसऱ्या बाजूला रायगड—स्वराज्याच्या दोन राजधान्यांच्या मध्ये उभे राहून आम्ही नतमस्तक झालो.
| कोकण दरवाजा, तोरणा किल्ला |
मेंगाई मातेचा आशिर्वाद:
गडावर पोहोचताच मेंगाई माता आणि महादेवाचे दर्शन घेतले. प्रवासाचा हा टप्पा आता संपत होता. उतरण्यापूर्वी तोरणजाई मातेचा आशीर्वाद घेतला आणि १२ च्या ठोक्याला बिनी दरवाजातून गड उतरण्यास सुरुवात केली. कोरीव पायऱ्या आणि तीव्र उतार पार केला. उन्हाचे चटके लागत होते. पण हा टप्पा झाल्याचा आनंद त्यापेक्षा मोठा होता. तासाभरात उतार सोपा झाला आणि आम्ही पायथ्याला पोहोचलो.
| मेंगाई देवी, तोरणा किल्ला |
एक सुखद सांगता:
वेल्हे गावात जाण्यापूर्वी तोरण्याच्या किल्लेदारांच्या समाधीपाशी जाऊन नतमस्तक झालो. तिथे असलेली कातळ शिल्पे इतिहासाची साक्ष देत उभी होती. गुंजवणे येथून बोलावलेल्या गाडीने आम्ही पुन्हा आमच्या दुचाकींकडे गेलो. वेल्हे ते गुंजवणे असा २२ किमीचा प्रवास करून आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. 'कात्रज ते रायगड' या स्वप्नवत प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला होता. आता वेध लागले होते ते 'तोरणा ते रायगड' या शेवटच्या टप्प्याचे! आणि त्यानंतरची अंतिम ध्येयपूर्ती असेल—कात्रज ते रायगड ही सलग पदभ्रमंती!
0 Comments