मोहनगड | Mohangad Fort Trek | Varandha Ghat | पुण्यातील अपरिचित किल्ला | Unexplored Fort in Pune | संपूर्ण माहिती | Complete Guide | वरंधा घाट | Information in Marathi

किल्लाची नावे - मोहनगड / दुर्गाडी किल्ला / जसलोडगड / जननीचा डोंगर / शिरगावचा किल्ला 
किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग
किल्ल्याची उंची - ३६८१  फूट
ठिकाण - भोर तालुका, पुणे जिल्हा 
पायथ्याचे गाव - शिरगाव 
ट्रेक श्रेणी - मध्यम 
सहनशक्ती पातळी - मध्यम 
वेळ (पायथा ते किल्ला) - २ तास
जवळील रेल्वे स्टेशन - पुणे 
दिनांक - ३१ मे २०२६  

mohangad

थोडक्यात माहिती / इतिहास
सह्याद्रीतील घाटवाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक गडकिल्ले बांधण्यात आले. वर्षानुवर्षे या किल्ल्यांनी या वाटांचं संरक्षक म्हणून काम केलं. पण काळाच्या ओघात काही किल्ले विस्मरणात गेले. असाच एक अपरिचित किल्ला म्हणजे मोहनगड ज्यास 
दुर्गाडी किल्ला / जसलोडगड / जननीचा डोंगर / शिरगावचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. रायगड आणि पुणे यांना जोडणाऱ्या वरंधा घाटाचा हा संरक्षक किल्ला. 

गडाला भेट देण्याचा उत्तम हंगाम
जानेवारी ते मे महिन्यात मार्ग व्यवस्थित दिसतो. असं म्हणलं जात कि जून ते डिसेंबर पर्यंत संपूर्ण मार्गात अतिशय जास्त प्रमाणात गवत, झाडी - झुडपे आल्याने इथे येणं सोपं राहत नाही. एकट्या दुकट्याने तर नक्कीच नाही. कातळाच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. पण अगदीच उभा चढ आणि तो हि उघड असल्याने पावसाळ्यात त्या निसरड्या होऊ शकतात. 

प्रवेश शुल्क 
गडावर जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. 

पार्किंग सुविधा
गडाच्या पायथ्याला रोडला लागूनच जननी मातेचं मंदिर आहे. तिथे आपण आपली गाडी पार्क करू शकता. तसेच कच्च्या रस्त्याने थोडं वर गेल्यावर देखील १५ - २० गाड्या पार्किंगपूर्ती जागा / सपाटी आहे. 

राहण्याची / कॅम्पिंगची / खाण्यापिण्याची / शौचालयाची सुविधा
गडावर/ट्रेक मार्गात कोठेही पिण्यायोग्य पाणी असलेले टाके नाही किंवा हॉटेल नाही. तसेच खाण्याची, राहण्याची किंवा शौचालयाची सोय नाही. राहण्याची सोय जननी मंदिरात होऊ शकते, फक्त आपल्याकडे पर्याप्त पाणी आणि जेवण असावे. तसेच अगदी उन्ह्याळ्यात देखील रात्रीच्या वेळी येथे थंडी वाजते. त्यामुळे त्याची सोय आपण करावी. आपल्याकडे टेन्ट असेल तर तो मंदिर शेजारी लावलेला उत्तम राहील. स्मारकाजवळील जागेत वाऱ्याचा जोर खूप जास्त असतो.  
राहण्याची / खाण्यापिण्याची / शौचालयाची सुविधा मात्र आपल्याला गडाच्या पायथ्याला, गावात किंवा जननी मातेच्या मंदिराकडे मिळतील.     

कुटुंबासाठी अनुकूल
लहान मुले किंवा वयोवृद्धांसाठी अनुकूल नाही. 

मोबाईल नेटवर्कची उपलब्धता
पायथ्याला आणि गडावर बऱ्याच ठिकाणी मोबाईल नेटवर्क (Jio) मिळते.

गुगल नकाशा स्थान

मोहनगड किल्ल्याला कसे पोहचाल?
रेल्वे मार्गे :- किल्ल्याजवळील रेल्वे स्टेशन पुणे असून इथून पुढे रोडमार्गे किल्ल्याला जावं लागत.   
रोड मार्गे :- हा किल्ला पुण्यापासून १०० किमी अंतरावर आहे. पुण्यावरून सातारा हायवेने कापूरहोळ गावी आणि तेथून भोरला यायच. भोर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वरंधा घाटाच्या दिशेनं मार्ग आहे. ह्याच मार्गावर वरंधा घाटाच्या अलीकडे शिरगाव लागतं. ह्या गावातून मार्ग दुर्गा किंवा जननी मंदिराकडं जातो. तेथून किल्ल्याकडे ट्रेक सुरू होतो. तसेच मंदिराआधी एक कच्चा रस्ता गडाच्या थोडं जवळ आपल्याला घेऊन जातो. पण दगड धोंड्यांमुळे थोडी अडचण होते. 
सध्या म्हणजेच मे २०२६ पर्यंत वरंधा घाटाकडे जाणाऱ्या मार्गाचं काम सुरु आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी याचा वापर फार कमी होतोय. त्यामुळे सध्या तरी स्वतःची गाडी असेल तरच इथे येणं सोयीचं राहील.  

mohangad
कच्चा रस्त्याने पार्किंगपासून घनदाट झाडी आणि गड

मी या किल्ल्याला आधी आलो नव्हतो आणि जास्त काही ऐकलं देखील नव्हतं. पण सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेत सक्रिय असल्याने, किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी प्रतिष्ठान तर्फे उभं राहत असलेल्या, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकंच उद्घाटन ३१ मे २०२६ रोजी होणार होते. त्यामुळेच अन्य दुर्गसेवकांसोबत पुण्यावरून वरंधा घाटाच्या दिशेने आदल्या रात्री निघालोत. शिरगांव पुढील कच्च्या रस्ताने बाईक घेतली खरी, पण बऱ्याच ठिकाणी बाईक वर चढवताना अडचण झाली. रात्री ११ वाजता आम्ही गाड्या पार्क करून मोहनगडाच्या दिशेनं चढाई सुरु केली. 

पायथा ते किल्ला ट्रेक
पायथ्याच्या जननी मातेच्या मंदिरापासून ट्रेक सुरु होतो. पण बहुतेक पर्यटक बाईक घेऊन कच्चा रस्ताने थोडं पुढे जाऊन ट्रेक सुरु करतात. हा सुरुवातीचा मार्ग घनदाट झाडीतून जातो. थोडीशी चढाई पून्हा थोडी सपाटी असं दोन तीन वेळा झालं कि तासाभरात आपण गडाच्या उभ्या कातळकड्याच्या टप्प्यात येतो.
जिथे लोक सहसा चुकीचे वळण घेतात :- मार्ग ओळखायला तितकीशी अडचण होत नाही. पण काही ठिकाणी जसे कि सुरुवातीला थोडं वर गेल्यावर काही मार्ग खालच्या दिशेने जाताना दिसतात ते गडाकडे जात नाहीत. तसेच ट्रेक मार्ग कातळाला भिडल्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूस दोन्हीकडे मार्ग दिसतो, पण योग्य मार्ग हा उजव्याबाजूला आहे. त्याशिवाय गड आपल्या नजरे समोरच असतो. पण पावसाळ्यात मात्र चित्र वेगळे असू शकते. असं म्हणलं जात कि जून ते डिसेंबर पर्यंत संपूर्ण मार्गात अतिशय जास्त प्रमाणात गवत, झाडी - झुडपे आल्याने इथे येणं सोपं राहत नाही. एकट्या दुकट्याने तर नक्कीच नाही. तसेच दाट धुक्यात मार्ग शोधण्यासाठी अडचण येऊ शकते. 
या कातळाच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. पण अगदीच उभा चढ आणि तो हि उघड असल्याने फार काळजीपूर्वक चढावे लागते. हा भाग चढून जाण्यासाठी अर्धा तास पुरेसा, पण सुरक्षेच्या दृष्टीने निवांत गेलं तर तासाभरात आपण गड गाठतो.

mohangad
किल्ल्याचा शेवटचा कातळाचा टप्पा

रात्री ११ वाजता सुरु झालेला आमचा ट्रेक, घनदाट झाडी आणि धुक्याने व्यापून टाकलेल्या मार्गाने तासाभरात कातळकड्यापाशी थोडा थांबला. बरीच लोक सोबत असल्याने हा टप्पा आम्ही फार काळजीने आणि निवांत केला. एकामागून एक, काही अंतराने आम्ही सर्व गडावर चढलोत.         

किल्ल्यावरील भेट देण्याची ठिकाणे
गड पोहचलो असं सांगणारी अवशेष जसे प्रवेशद्वार किंवा तटबंदी आम्हाला येथे पाहायला मिळाले नाहीत. गडाला सर्व बाजूनी नैसर्गिक तटबंदी मिळाल्याचे दिसते. जननी मातेच्या मंदिराकडे जाण्याआधी डाव्या बाजूला बारीक वाट पाण्याच्या टाक्याकडे जाते. अगदीच उघड असलेल्या या वाटेने थोडं सांभाळून जावं. येथे एक खांब टाकं देखील आहे.

mohangad water tank
खांबटाके

टाकीपाहून पुन्हा मुख्य मार्गावर येऊन सरळ गेले कि समोर जननी मातेचं मंदिर आहे. गावकरी मोठ्या भक्तिभावाने पायथ्याच्या आणि गडावरील या गडदेवतेची नियमित पूजा करतात.

janani temple mohangad
जननी / दुर्गा मातेचं मंदिर

मंदिराच्या मागून दोन वाटा जातात. एक वाट डाव्या बाजूला अगदीच कड्याला जाऊन थोडी खाली उतरते जिथे एक पाण्याचं टाकं आहे. अगदीच कड्याला, निसरत्या मातीची वाट असल्याने थोडी अवघड आहे. पायात चांगले बूट आणि अनुभव असेल तरच ह्या बाजूस जावे. 

mohangad water tank
पाण्याचं टाकं

दुसरी वाट सरळ गडाच्या सर्वोच्च ठिकाणी जाते जिथे आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं राहिलं आहे. अरुंद पायवाट, घनदाट झाडी, उभ्या कातळाचा टप्पा, या सर्व आव्हानांना ओलांडून हे स्मारक उभ राहिल. सलग चार वर्षाच्या मेहनतीतून, सह्याद्री प्रतिष्ठाणच्या दुर्गसेवकांच्या कष्टातून हे सर्व साकार झालं. यातून या अपरिचित गडाला एक नवीन ओळख मिळो, महाराष्ट्र व देशभरातून गडप्रेमी आणि भटकंती प्रेमींची पाय येथे वळो, हिच सदिच्छा.      

mohangad shivaji maharaj statue
मोहनगडावरील शिवरायांचं स्मारक 

आम्ही रात्री १ च्या सुमारास गडावर आल्याने या पाण्याच्या टाक्या पाहण्याची जोखीम घेतली नाही. जननी मातेचा आशीर्वाद घेतला आणि स्मारकाच्या ठिकाणी गेलोत. आम्ही ह्या स्मारकाचा दुर्गापण सोहळा पाहिला हे आमचं भाग्यच. सोसाट्याचा वारा सोबतच हवेतील गारवा वाढत चालला होता. त्यात नवीन ऊर्जा संचारली ती जागरण गोंधळाने. सकाळी पाचच्या सुमारास सजावटीस सुरुवात झाली आणि सात पर्यंत संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सर्व दुर्गसेवकांनी नेहमीप्रमाणे भंडारा उधळत आनंद साजरा केला. बर अजूनही गड पूर्णपणे धुक्यातच गडद होता. आठच्या सुमारास धुकं कमी झालं आणि गडावरील जननी मातेच्या मंदिराकडून पाण्याच्या टाक्याकडे पाहायला गेलो. अंधारात तिथे जाणे जरा जोखमीचं राहिला असत. गडाकडे येणारा संपूर्ण मार्ग आता दिसत होता. गडावरून अनेक किल्ले नजरेस पडतात. वातावरण थोडसं अस्वच्छ जरी असलं तरी मंगळगड, राजगड, तोरणा, रोहिडा सहज ओळखू आले. पायथाच्या जननी मातेचा आशीर्वाद घेतला. महाप्रसाद घेऊन परतीच्या मार्गाला लागलो.

सुरक्षेसाठी महत्त्वाची सूचना
कातळाच्या टप्प्यात किंवा गडावर रेलिंग अजून तरी बसवण्यात आली नसल्याने अगदीच टोकाला जाणे टाळावे.
कड्याला / उभ्या कातळाच्या टप्प्यात फोटो / विडिओ काढणे टाळावे.

जवळपासची आकर्षणे
वरंधा घाट 
कावळा किल्ला 
नीरा - देवघर धरण जलाशय

गडावरील किंवा जवळील संपर्क 
वरंधा घाटाच्या मार्गात, शिरगाव आल्यावर, गडाकडे जाणाऱ्या वाटेला 'हॉटेल नवदुर्गा' नावाचे हॉटेल मी पाहिले होते. त्यांच्या बोर्डवर त्यांनी लिहिलेला संपर्क आणि नाव येथे शेयर करत आहे.
हॉटेल नवदुर्गा - श्री. ज्ञानोबा पोळ ८९८३५१७९६५   

माझी जबाबदारी
मी केलेला कचरा परत घेऊन जाणे.
ऐतिहासिक वास्तूंना नुकसान न पोहचवणे.
मोठ्या आवाजात संगीत न लावणे.
स्थानिक चालीरीतींचा आदर करणे. 

English Version

यूट्यूब विडिओ लिंक

Frequently Asked Questions
1. Is it suitable for beginners? NO

2. Is camping allowed? YES

3. Is permission required? NO

4. Are guides available? YES (ask villagers)

5. Can I visit during heavy rain? NOT RECOMMENDED

6. Can this trek be completed in one day? YES

7. Are there any technical climbing sections? NO

8. Are there exposed cliffs or narrow traverses? YES

9. Is the trail well-marked? NOT MUCH

10. Which is main attraction of the place? JANANI TEMPLE & Chh.SHIVAJI Maharaj Memorial 

#mohangad #jananichadurg #jananichakilla #shirgaonfort #shirgaonchakilla #durgadifort #durgadi #shirgaon #bhor #pune

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu